नवी दिल्ली । काही महिन्यांपूर्वी एअरटेलसह जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. आता एअरटेलने या वर्षी पुन्हा दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. आपला ARPU 200 रुपयांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंपनीच्या ग्राहकांना धक्का बसला तरी कंपनीच्या मागे हटणार नाही.
भारती एअरटेल लिमिटेडने बुधवारी सांगितले की,”तिसर्या तिमाहीत टॅरिफ वाढ आणि गुगलने केलेल्या गुंतवणुकीमुळे आपल्या मजबूत कामगिरीमध्ये लक्षणीय योगदान आहे. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 26,518 कोटी रुपये होते.”
यावर्षी वाढ होईल
एका पोस्ट अर्निंग कॉलमध्ये, एअरटेलच्या टॉप मॅनेजमेंटने सांगितले की,” प्लॅनची किंमत पुन्हा वाढू शकते.” मॅनेजमेंटने सांगितले की,”जर दोन ते चार महिन्यांत टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ झाली नाही, तर या कॅलेंडर वर्षाच्या शेवटी वाढ होऊ शकते.” मॅनेजमेंटने पुढे असेही सांगितले की,” कंपनी 2022 मध्ये ARPU 200 रुपयांपर्यंत दरमहा नेण्याची अपेक्षा करत आहे.”
कंपनीने या तिमाहीत (Q3) 830 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 854 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. मात्र , कंपनीने ARPU मध्ये मोठी उडी घेतली आहे.भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गोपाल विट्टल यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल फोन सेवांच्या दरांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे, पर युझर ऍव्हरेज रेव्हेन्यू (ARPU) रुपये 163 झाली आहे.
मात्र, सुधारित मोबाइल दरांचा संपूर्ण परिणाम चौथ्या तिमाहीत दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. भारती एअरटेलवरील कर्जाचा बोझा वाढला आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीवर 1.59 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 1.47 लाख कोटी रुपये होते. NSE वर Bharti Airtel चे शेअर्स बुधवारी 1.55% वाढून 719.90 रुपयांवर बंद झाले.