नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासह अनेक शुल्क वाढले आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना अजून एक झटका बसणार आहे. आगामी 1 फेब्रुवारी पासून एसबीआयच्या IMPS या लोकप्रिय पेमेंट सेवेसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये + GST असेल. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे ट्रान्सझॅक्शनसाठीच्या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती त्यानुसार SBI ने यासाठी 20 रुपये + GST असे शुल्क आकारले आहे.
IMPS म्हणजे काय ?
IMPS ला इमीडियेट मोबाइल पेमेंट सर्व्हिस म्हणतात. IMPS ही बँकांद्वारे ऑफर केलेली लोकप्रिय पेमेंट सर्व्हिस आहे, जी रिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरला परवानगी तर देतेच तसेच ती रविवार आणि सुट्ट्यांसह 24 X 7 उपलब्ध आहे.
एटीएममधून पैसे काढणे महागणार
दरम्यान, जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. एटीएममधून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ग्राहकाला जास्त शुल्क द्यावे लागेल. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममधील मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक ट्रान्सझॅक्शनवर 21 रुपये + GST लागू होईल. हे सुधारित दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील.
नवीन मर्यादा अशी असेल
पुढील महिन्यापासून, ग्राहकांनी मोफत ट्रान्सझॅक्शनची मासिक मर्यादा ओलांडल्यास 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति ट्रान्सझॅक्शन द्यावे लागतील. RBI ने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे, त्यांनी ट्रान्सझॅक्शनवरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे.