इंस्टाग्रामच्या सवयीमुळे 11 वीत शिकणाऱ्या मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

जयपूर : वृत्तसंस्था – एखादा व्यक्ती कोणत्याही गोष्टीच्या आहारी गेला तर आणि ती जर नाही भेटली तर तो व्यक्ती आपल्या जीवाचे बरेवाईटदेखील करत असतो. अशीच एक घटना राजस्थानातील पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. 16 वर्षीय योगेशला इंस्टाग्रामवर रील्स बनवायचे व्यसन जडले होते. ह्या रिल्स बनवत असताना अभ्यास तर सोडा त्याला खाण्यापिण्याचीसुद्धा आठवण येत नव्हती. त्याच्या या सवयीला त्याची आई खूप वैतागली होती. या गोष्टीवरून ती सतत त्याला ओरडत असायची. मात्र तिच्या बोलण्याचा योगेशवर फारसा काही प्रभाव पडत नव्हता. यानंतर त्याच्या आईने रागाने त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. आईच्या या कृत्याचा त्याला इतका राग आला कि त्याने विहिरीत उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

मुंडारा गावाचे रहिवाशी ट्रक ड्राइवर हरिलाल मेघवाल यांचा 16 वर्षांचा मुलगा योगेश बावल हा 11वीत सायन्समध्ये शिकत होता. वडील ट्रक ड्राइवर असल्यामुळे ते कामासाठी अधिकतर बाहेर असत. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी योगेशची आई लीलादेवी यांच्यावर होती. मागच्या काही महिन्यांपासून योगेशला मोबाइलवर शॉर्ट व्हिडीओ तयार करण्याचे व्यसन जडले होते. कॉलजमधून घरी आला कि तो मोबाइल घेऊन घराबाहेर पडायचा. यानंतर तो गावातील तलावाशेजारी किंवा इतर ठिकाणी आपले शॉर्ट व्हिडिओ तयार करायचा.

त्याच्या या सवयीला वैतागून 7 जानेवारी रोजी योगेशच्या आईने त्याला दिवसभर मोबाइल दिला नाही. याचा राग आल्याने योगेश सायंकाळी साधारण 5 वाजता घरच्यांना काही न सांगताच घराबाहेर पडला. तो खूप वेळ झाला आला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही सापडला नाही. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर रविवारी गावातील विहिरीत योगेशचा मृतदेह तरंगताना दिसला. यानंतर पोलिसांना बोलावून मृतदेह बाहेर काढण्यात आला. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्याच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.