औरंगाबाद – मागील काही महिन्यांपासून औरंगाबाद शहर व परिसरात खुनांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यातच आता दारू पिऊन आलेल्या मुलाला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केल्याचा राग अनावर झाल्याने आपल्या वृद्ध बापाला बेवड्या मुलाने बेदम मारहाण केली. त्याने बापाचे डोके भिंतीवर आपटले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वृद्ध बापाचा शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे औरंगाबाद शहर हादरले असून पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील दलालवाडी भागातील भिकनराव शेळके (55) हे कामगार आहेत. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा विकास शेळके (32) हा मोबाईल रिपेरिंग चे काम करत होता. मात्र, तो दारूच्या आहारी गेल्याने एका वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली. मुलगा सांभाळत नसल्याने भिकनराव शेळके हे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास गेले होते. दलालवाडीत विकास हा आईसोबत राहत होता. शुक्रवारी मात्र भिकनराव शेळके हे दलालवाडी येथील घरी आले होते. याच दरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास विकास दारूच्या नशेत घरी आला, तेव्हा त्याला वडिलांनी ‘तू कमावत नाहीस, घरात येऊ नकोस’ असे म्हणत विकासला घराबाहेर जाण्यास सांगितले.
घरातून हाकलल्याचा राग अनावर झाल्याने विकास ने घरात घुसून वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यात दगड घालून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. घरातील आरडाओरड ऐकून शहरातील काही नागरिकांनी भिकनराव यांची मुलाच्या तावडीतुन सुटका केली. या मारहाणीत भिकनराव गंभीर जखमी झाले होते. पोलिसांकडे व्हॅन उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी भिकनराव यांना तात्काळ उपचारासाठी घाटीत दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा क्रांती चौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.