धक्कादायक : 8 महिन्याच्या मुलास पोटाला बांधून महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तालुक्यातील कासारशिरंबे येथे आठ महिने वयाच्या मुलास पोटाला बांधुन 23 वर्षीय महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना पालकराचा मळा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. राजश्री शंकर रासकर वय 23, मुलगा शिवतेज वय 8 (दोघे रा. कडेगाव जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत वनिता बबन दगडे (वय 40, रा. काटकर मळा, कासारशिरंबे) यांनी कराड ग्रामीण पोलिसांत खबर दिली आहे. वनिता व त्यांचे पती बबन हे दोघे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या पालकराचा मळा नावाच्या शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी निघाले होते.

संतोष दत्तात्रय पाटील यांच्या विहिरीकडेच्या पाऊलवाटेने जाताना त्यांना तेथे लहान मुलाची दुधाची बाटली व दुपटे दिसून आले. त्यामुळे त्यांनी विहीरीत डोकावून पाहिले. त्यावेळी विहिरीत त्यांना एका महिलेचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील व ग्रामस्थ घटनास्थळी आले. मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. त्यावेळी मृत महिलेने स्वत:च्या मुलास पोटाला बांधल्याचे व या घटनेत मुलाचाही मृत्यू झाला असल्याचे समोर आले. मृत महिला ही बहिणीची मुलगी राजश्री शंकर रासकर वय 23 व तिचा 8 महिन्याचा मुलगा शिवतेज असल्याचे वनिता दगडे यांनी ओळखले.

या घटनेची माहिती मिळताच कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. दुपारी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतांच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली.

मृत राजश्री रासकर हिचे माहेर वाळवा तालुक्यातील नेर्ले असून सासर कडेगाव (जि. सांगली) आहे. तिचे मावशीच्या गावी कासारशिरंबे येथे प्राथमिक शिक्षण झाले होते. दोन वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता. तिचे मानसिक स्वास्थ बिघडले होते. ती दवाखान्यात जाते, असे सांगून सोमवारी सकाळी कडेगाव येथून निघून आली होती. मात्र दवाखान्यात न जाता ती सायंकाळी कासारशिरंबे येथे पोहोचली. तिने मावशीकडेही न जाता मुलासह आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे तपास करत आहेत.