सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे बलगवडे ते भिवघाट रस्त्या कडेला साधारणपणे ५ ते ६ महिने वय असणारे स्त्री जातीचे बाळ पहाटे व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांना ६ वाजता आढळून आले. सदर बाळ सुखरूप असून त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.
घटनास्थळी स्त्री जातींचे अर्भक असल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. बलगवडे गावातील लोकं पहाटे तासगाव भिवघाट रस्त्यावर व्यायामासाठी जात असतात. रविवारी पहाटे व्यायामाला गेले असता रस्त्याकडेला लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. या आवाजाने प्रारंभी अंधार असल्याने संबधित लोकांच्यात संभ्रम निर्माण झाला.
मात्र सततच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत अंदाजे सहा महिने वयाचे स्त्री जातीचे बाळ आढळून आले. त्यानंतर पाहिले असता गटारीत फेकून दिलेल्या बाळाच्या तोंडाला थोडी जखम झाली होती तर बाळ गुडाळलेल्या कपड्याने गवतातील कुसळ ,धूळ माखली होती. थंडीमुळे बाळ एक सारखे रडत असल्याने त्याला तातडीने गावातील प्राथमिक उपकेंद्रात आणण्यात आले.