धक्कादायक ः कोरोनामुळे कराड तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा चोवीस तासात मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील सैदापुर- विद्यानगर येथे कोरोनामुळे एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अवघ्या चोवीस तासांत आई- वडिलांसह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने  विद्यानगरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या कुटुंबातील मुलगा मिलिंद हरिभाऊ उमराणी,  आई शीला हरिभाऊ उमराणी, तर वडील केशव ऊर्फ हरिभाऊ पांडुरंग उमराणी यां तिघांचाही मृत्यू झाला आहे.

उमराणी कुटुंब पूर्वी कऱ्हाड शहरातील पंताचा कोट परिसरातील रहिवाशी होते. सध्या विद्यानगर येथे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न समारंभासाठी कुटुंबीय पुणे येथे गेले होते. लग्न समारंभ उरकून ते पुन्हा विद्यानगरला आले होते. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वतःसह कुटुंबीयांची कोरोना टेस्ट केली. यावेळी या तिघांसह अन्य सदस्यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.  आई, वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मिलिंद उमराणी व अन्य सदस्यांनी गृह विलगीकरणात उपचार घेत होते. संदीप देसाई यांच्याशी संपर्क करून सरपंच फत्तेसिंह जाधव यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घर सॅनिटायझ केले होते.

मिलिंद यांना काही दिवसांतच खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे व त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु शनिवारी रात्री मिलिंद उमरानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी रात्री त्यांचे वडील हरिभाऊ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्यांच्या आई शीला यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. चोवीस तासांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

You might also like