सोलापूर | देशात कोरोनानं थैमान घातलेलं असतानाही निवडणूक आयोगाने पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूक घोषित केली. त्याचे परिणाम आता दोन्ही तालुक्यातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता निवडणूक कर्तव्य बजावलेल्या सांगोला तालुक्यातील एका शिक्षकासह त्यांच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या निवडणुकीत नेमणूक झालेल्या शिक्षकासह संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्ग झाला. यात या शिक्षकासह त्यांचे वडील, आई आणि मावशीलाही जीव गमवावा लागलाय.
पंढरपूर निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. येथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील व मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद यांचेवर सांगोला येथे सुरुवातीला उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई येथे हलवले. मात्र प्रयत्नांची शिकस्त करूनही प्रमोद माने यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला व मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी व मुलगा याने कोरोनावर मात केली असली तरी या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.
पोटनिवडणुकीनंतर मृत्यूचे आणि बाधितांचे आकडे वाढले
केवळ पंढरपूरला 20 दिवसांत मतदानानंतर 126 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून ग्रामीण भागातील आकडे यात सामील नाहीत. अशीच अत्यंत भयावह अवस्था मंगळवेढा येथे झाली असून आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाने शिकार बनवले आहे. ना हॉस्पिटलमध्ये बेड ना ऑक्सिजन ना रेमेडिसिवीर अशी अवस्था असताना अंत्यसंस्कारालाही ताटकळत थांबायची वेळ आली आहे