Video धक्कादायक : केवळ 15 हजारांसाठी पोटच्या मुलीला विकले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात धक्कादायक प्रकार घडला असून अवघे 15 हजार रुपये पैसे घेऊन पोटच्या एक वर्षाच्या लहान मुलीला दिल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील मंगळवार पेठेतील कुचेकर येथील महिलेने आपल्या पोटच्या मुलीला पैशाच्या बदल्यात उचलून नेल्याचा आरोप बाबर दांम्पत्यावर केला होता. त्यानंतर सदरबझार येथील संजय बाबर आणि अश्विनी पवार- बाबर यांनीही कुचेकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्ये कुचेकर यांनी केवळ 15 हजारासाठी बाळ दिल्याचे समोर आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

बाबर दाम्पत्याने हे बाळ 15 हजार रुपये देऊन स्वतःजवळ ठेवून घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कुचेकर व बाबर दांम्पत्याच्या दोन्ही बाजूने हा सर्व प्रकार संशयास्पद असल्यामुळे याचा तपास शहर पोलिस करत असून याबाबतची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली आहे. सातारा पोलिस याचा तपास करत आहे. संबंधित एक वर्षाच्या लहान मुलीला पोलिसांनी म्हसवड येथील शिशु बाल सुधार केंद्रात दाखल केले असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले आहे.

श्री. बोऱ्हाडे म्हणाले, तसेच बाबर दांम्पत्यांने मुलीला सोबत ठेवल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे. परंतु खासगी सावकारीबाबत त्यांच्या घराची झडती घेवून त्याबाबत पुरावे सापडतायत का ते बघितले जाईल. त्याप्रमाणे गुन्हे नोंद करण्यात येतील. सदरील कुचेकर या महिलेने त्या स्वतः सांगत आहेत,त्याप्रमाणे पैसे घेवून बाळ ताब्यात दिले आहे.