मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी पहाटे बोरिवलीच्या संक्रमण शिबीर इमारतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये माया जयशंकर सिंह यांचा सात मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. त्या मानसिक रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरू होते असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यानुसार कस्तुरबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. माया सिंह या मुलगा अंकुश याच्या सोबत संक्रमण शिबिरात गुलमोहर या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत होत्या.
मंगळवारी सकाळी त्या इमारत परिसरात जखमी अवस्थेत स्थानिकाना आढळून आल्या. याबाबत त्यांनी पोलिसांना व अंकुशला कळविले. याची माहिती मिळताच कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना कांदिवलीच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. अंकुश हा खासगी कंपनीत नोकरीला आहे.अंकुश आणि आई माया जयशंकर सिंह हे दोघेच याठिकाणी राहत होते. त्याची आई मानसिक रुग्ण होती आणि जिच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती अंकुशने पोलिसांना दिली.
महिनाभरापूर्वी सिंह यांना शिव रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र अचानक घरातून त्या निघून जायच्या आणि परत यायच्या.’मंगळवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे घराबाहेर कोणीच नव्हते.यामुळे त्या पडल्याचे कोणीही पाहिले नाही. तसेच संक्रमण शिबिर असल्याने आसपास सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा नव्हते. मात्र सिंह यांची वैद्यकीय कागदपत्रे पडताळून पाहण्यात आली असून अद्याप तरी यात काही संशयीत बाब आढळलेली नाही. यानुसार अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांनी दिली आहे.