सातारा | खटाव तालुक्यातील एका गावातील 7 वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाला असून वैद्यकीय तपासणीत चार महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पीडीतेच्या आईने औंध पोलिसांत अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील अल्पवयीन मुलगी ही एका शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. पीडीत मुलीच्या पायाला सूज आल्याने कुटुंबीयांनी नजीकच्या मोठ्या गावातील एका खाजगी डॉक्टरांकडे 6 एप्रिलला उपचारासाठी नेले होते. त्यांनी उपचार करुन औषध दिले. मात्र, या औषधाने फरक न पडल्यास वडूज येथे उपचारास जाण्यास सांगितले होते.
औषधोपचाराने फरक न पडल्याने दि. 8 एप्रिलला पीडीत मुलीस वडूज येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती मुलगी गरोदर असल्याचे सांगून डॉक्टरांनी तीला सातारा येथे उपचारासाठी पाठवले. दरम्यान, पीडीत मुलीच्या कुटुंबाने मुलीस या प्रकाराची माहिती विचारली.
पिडीत मुलगी काही सांगू शकत नसल्याने कुटुंबीयांनी तिला 11 एप्रिलला सातारा येथे उपचारासाठी नेले. सातारा येथील रुग्णालयात तपासणी केली असता पीडीत मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुलीच्या भोळसट स्वभावाचा गैरफायदा घेवून अज्ञाताने अत्याचार केल्याचे पीडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास औंध व पुसेसावळी पोलिस करत आहेत.