सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरात सदरबाजार परिसरात गेले वर्षभरापासून नागरिकांना वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने जीवन प्राधिकरण विरोधात नगरसेवकांनी “शोले स्टाईल” आंदोलन केले. सदरबाजार परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर व्हावी, यासाठी नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन केले.
साताऱ्यातील सदर बाजारमधील नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट भरली जात असल्याने नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या परिसरात मागील वर्षभरापासून व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे आज संपूर्ण टाकी भरेपर्यंत सकाळी सात वाजल्यापासून नगरसेवकांनी टाकीवर बसून आंदोलन केले.
या संदर्भात जीवन प्राधिकरणाने लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर जन आंदोलन करणार असल्याचेही यावेळी नगरसेवकांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मिलिंद काकडे, विशाल जाधव हे पाण्याच्या टाकीवर बसले होते.
नगरसेवकांचा स्टंट तर नाही ना?
सातारा शहरातील सदरबाजार परिसरात वर्षभरापासून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचे नगरसेवकांनीच सांगितले आहे. वर्षभरापासून या समस्येला तोंड द्यावे लागत असताना, नगरसेवक काय करत होते असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे. येत्या सहा महिन्यावर सातारा नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने नगरसेवकांचा हा स्टंट तर नाही ना?