बीड – कुटुंबियांकडून लग्नाला होकार मिळावा, या मागणीसाठी बीडमध्ये एका प्रेमी युगुलाने चांगलाच हंगामा केला. आधी आमच्या लग्नाला होकार द्या, अशी मागणी करत हे दोघेही बीडमधील एका पाण्याच्या टाकीवर चढून बसले. परवानगी दिली तरच खाली येतो, अन्यथा इथून उडी मारतो, अशी धमकीही या दोघांनी दिली. यामुळे बीड शहरात चांगलीच खळबळ माजली. सुमारे 10 तास हा ड्राम चालला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हे प्रकरणी रात्री उशीरा निवळले.
बीड शहरातील तरुण हा काही कामानिमित्त हिंगोलीत काही काळ वास्तव्यास होता. तिथे त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, याची माहिती कुटुंबियांना झाली. महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. मात्र ती पतीपासून दूर राहते. यामुळे मुलाच्या कुटुंबियांनी मुलाला परत बीडला आणले होते. त्यानंतर तो पळून गेला होता. महिनाभरानंतर त्याला शोधण्यात आले. दरम्यान रविवारी, हिंगोलीहून महिला बीडमध्ये आली. त्यानंतर हा सर्व ड्रामा सुरु झाला. दुपारी बारा वाजेपनंतर तरुण आणि महिला बीड शहराती अंबिका चौक परिसरात असलेल्या अमृत अटल योजनेच्या टाकीवर चढले. मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. आताच आमचे लग्न लावून द्या, अन्यथा उडी मारतो, असे म्हणत दोघांनी टाकीच्या शेवटच्या टोकावर ठिय्या मांडला.
दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नगरसेवकही आले. बघ्यांची गर्दी जमली. सर्वांनी या प्रेमीयुगुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लग्न लावून देण्याची तयारीही दर्शवली. तरीही हे युगुल रात्री दहा वाजेपर्यंत खाली आले नाही. सुरुवातीला लग्नाची मागणी मान्य करण्यासाठी हे प्रेमी युगूल टाकीवर चढून बसले होते. मात्र ही मागणी मान्य केल्यानंतरही त्यांना खाली येण्यास भीती वाटत होती. टाकीच्या खाली झालेली गर्दी पाहून आपण खाली आलो तर मारहाण होईल, या भीतीने युगूल खाली येतच नव्हते. अखेर मोबाइलवर फोन करून त्यांची समजूत काढण्यात आली.