हवेत गोळीबार : साताऱ्यातील वीर धरण परिसरात पार्टी करणाऱ्या 9 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील वीर धरण परिसरात तोंडल (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत पार्टीचे आयोजन करत दारू पिऊन हवेत गोळीबार करणाऱ्या बारामती व खंडाळा तालुक्यातील 9 जणांच्या टोळीला शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी किरण देविदास निगडे (वय ४६ रा.गुळूंचे ता.पुरंदर ), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय २८, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय ३४, रा.चोपडज,पोस्ट करंजे, ता.बारामती ), माधव अरविंद जगताप (वय ३२,रा.वाकी पोस्ट करंजे ता.बारामती ), तात्याराम अर्जून बनसोडे (वय ३८,रा.अंथूर्णे ता.इंदापूर जि.पुणे), विजय ज्ञानदेव साळूंखे (वय ३९,रा.चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता.बारामती ), योगेश प्रकाश रणवरे (वय ४२, रा.राख ता.पुरंदर ), वसंत नामदेव पवार (वय ४७,रा.कोळविहीरे ता.पुरंदर ), अरविंद घनशाम बोदेले (वय ४१,सध्या रा.लवथळेश्वर, जेजूरी ता.पुरंदर, मूळ रा.भिवापूर जि.नागपूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

यामध्ये किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली बंदूक, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किरण निगडे याने स्वत: दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करीत बेकायदेशीररित्या मित्र योगेश रणवरे याला बंदूक दिली व त्यानेही हवेत गोळीबार करत वीर धरण परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत त्यांना पोलिसी खाक्या दाखविला.

याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनचे हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा , भारतीय शस्ञ अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहेत.

Leave a Comment