हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला. तसेच श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख सुपर सीएम असा करण्यात आला. या आरोपानंतर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे . तसेच विरोधकांचे आरोपही खोडून काढले आहेत.
श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. कोणीही त्यांचा कारभार सांभाळण्याची गरज नाही. व्हायरल फोटोमध्ये जे कार्यालय दिसत आहे ते आमचं घरचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघेही त्याचा उपयोग करतो. ते शासकीय कार्यालय नाही. मी वर्षा निवासस्थानी बसलोय किंवा मंत्रालयाच्या मुख्यमंत्री कार्यालयात बसलोय, असं नाही.
तसेच माझ्या मागे दिसणारा मुख्यमंत्र्यांचा बोर्ड टेम्पररी होता, तो एका जागेवरुन दुसरीकडे नेता येतो. एकनाथ शिंदे साहेबांची व्हीसी असल्यामुळे त्याचं नियोजन करण्यात आलं होतं. फोटोत चुकीचा अँगल घेऊन कुणाला तरी मुद्दाम खोडसाळपणा करायचा होता असं म्हणत आम्हाला बदनाम करण्याचं काम विरोधकांकडून होतोय असा थेट आरोप श्रीकांत शिंदेनी केला.