कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्यासाठी सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फंडातील 25 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत होणार आहे. राज्यातील अन्य खासदारांनी श्रीनिवास पाटील यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून कोरोना विरोधात सातारा जिल्हा लढा देत आहे. जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी आणि प्रशासनालाही निगडीत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून 25 लाखाचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोल गडीकर यांच्याशी याबाबत खा. पाटील यांनी चर्चा केली आहे. त्यानुसार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये कोरोना बाबत उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य, टेस्टिंग किट, डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्यासाठी लागणारे सुरक्षा मास्क, कपडे, थर्मल स्कॅनर आदी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी वर्ग करण्यासाठी आपली मान्यता कळवली आहे. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन देखील खा. पाटील यांनी केले आहे.