‘पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा; पण धनंजय मुंडेंसारखा नसावा’

सांगली । सागंलीतील गदिमा कविता महोत्सावाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी सध्या राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या धनंजय मुंडे प्रकरणावरून टोलेबाजी केली. पाटील हा खासदार श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण तो धनंजय मुंडेंसारखा नसावा, असा चिमटा श्रीपाल सबनीस यांनी काढला. (shripal sabnis reaction on dhananjay munde rape case)

आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पुण्याच्या गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीसही उपस्थित होते. याप्रसंगी कविता, नृत्य आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. नृत्याचा कार्यक्रम झाल्यावर मान्यवरांची भाषणं झाली. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक करतानाच धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमाचा धागा पकडत सबनीस यांनी टोलेबाजी केली. समोर कोणकोण नाचत होत्या. नंतर किती घायाळ झाल्या असतील. मी आमच्या पीडी पाटील सरांबद्दल खात्री देतो. पण, श्रीनिवास पाटील सरांबाबत खात्री देऊ शकत नाही. सबनीसांसारखा रंगेल माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही. पाटील असाच असावा लागतो. परंतु, धनंजय मुंडेंचं जे काही प्रकरण सुरू आहे. तसा पाटील आम्हाला नकोय. तसा पाटील सिनेमा, नाटक आणि साहित्यात रंगवला गेलाय. तो प्रत्यक्षात नको, असं सबनीस म्हणाले. सबनीस यांच्या या टोलेबाजीला रसिक टाळ्या वाजवून दाद देत होते. (shripal sabnis reaction on dhananjay munde rape case)

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like