हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी आता थंडावली आहे. यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष सत्यजीत तांबे हे विजय झाले. पण पराभूत उमेदवार शुभांगी पाटील या चांगल्याच चर्चेत आल्या. पराभवानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून ‘पराभव झाला असला तरी अजिबात खचून जाणार नाही. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. शिवसेनेची साथ मी कधीच सोडणार नाही, असे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे.
पदवीधर निवडणुकीत पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झाले नाही. पण पाच जिल्ह्यातून मला ४० हजार मते मिळत असतील तर जनतेचे मी आभारी आहे. मी शिवसैनिकांचे आणि महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. यात जुन्हा पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म हे सगळ्यांना माहित आहे.
आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. मी माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार, असे शुभांगी पाटील यांनी म्हंटले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. या चुरशीच्या लढतीत तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी झाले.