नांदेड | साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी व रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या सातारच्या हिरकणी महिला रायडर्स ग्रुपमधील महिलेचा दुचाकीला नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भोकर फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या अपघात जागीच मृत्यू झाला आहे. आज दि.12 रोजी मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातात सातारा जिल्ह्यातील हिरकणी रायडर शुभांगी पवार (वय- 42) हिचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला.
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या दि. 10 ऑक्टोबर रोजी बाहेर पडल्या. या हिरकणी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी मोटारसायकलवरून निघाल्या होत्या. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर येथे पोहचल्या. पुढे आई तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर पुढे माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी ते सर्वजण जात होते. त्यावेळी भोकर फाटा दाभड येथे शुभांगी पवार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने शुभांगी जागीच ठार झाल्या. या घटनेने साताऱ्यात हळहळ व्यक्त आहे.
शुक्रवारी यात्रेची सांगता होणार होती
या यात्रेची सांगता शूक्रवारी दि. 15 रोजी सातारा येथे होणार होती. ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता. या यात्रेला सातारा येथील पवई नाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता. ही यात्रा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तुळजापूरची तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नांदेडमार्गे माहुरला जात होती. सात दुचाकी नांदेडमार्गे माहुरला जात असताना भोकर फाट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभांगी संभाजी पवार यांच्या दुचाकीला (एमएच- 11 सीए 1447) भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (जीजे 12 एटी 6957) धडक दिली.