हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे भाजपला आस्मान दाखवत सत्ता काबीज केली. काँग्रेसच्या या ऐतिहासिक यशानंतर सुद्धा पक्षासमोर मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला आहे. ज्या २ नेत्यांनी काँग्रेसच्या सत्तेसाठी जीवाचं रान केलं ते सिद्धरामय्या आणि डिके शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. यामुळे काँग्रेस हायकमांड पुढे मोठा प्रश्न पडला असतानाच आता सिद्धरामय्या यांनी काँग्रेस हायकमांडला एक फॉर्म्युला सुचवला असून पहिली २ वर्ष त्यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे आणि त्यानंतर ३ वर्ष डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे असं त्यांनी हायकमांडला सांगितल्याची चर्चा सुरु आहे.
सिद्धरामय्या हे शिवकुमार यांच्यासोबत मुख्यमंत्रीपद शेअर करण्यास इच्छुक आहेत. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना पहिली टर्म हवी आहे आणि बाकी ३ वर्ष डिके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे असं त्यांनी सांगितलं आहे. सिद्धरामय्या म्हणाले, ‘वय झाले असल्याने त्यांना पहिल्या टप्प्यात किमान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सरकार चालवायचे आहे. मात्र, शिवकुमार यांनी राजस्थान आणि छत्तीसगडचा हवाला देत सिद्धरामय्या यांचा हा फॉर्म्युला फेटाळून लावल्याची चर्चा आहे .
सिद्धरामय्या हे कुरबा समाजाचे आहेत तर डीके शिवकुमार वोक्कलिगा समाजाचे आहेत. डिके शिवकुमार यांनी गेल्या तीन वर्षांत केलेले प्रयत्न पक्षाला चांगलेच ठाऊक आहेत. डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री न केल्यास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशीही भीती आहे. कारण काँग्रेसच्या अडचणीच्या काळात संकटमोचक म्हणून त्यांनी पक्षासाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे डिके यांच्या संघटनात्मक कौशल्याला प्राधान्य द्यायचे की सिद्धरामय्या यांच्या प्रशासकीय कौशल्याला, यावर निर्णय घेणे काँग्रेस हायकमांडसमोर मोठं आव्हान असेल.