औरंगाबाद प्रतिनिधी । सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात वाईन शॉपवर हल्ला करण्यात आला होता. यात मॅनेजर भिकन निळूबा जाधव व त्याचा सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे या दोघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडील 4 लाखांची रोख रक्कम घेऊन अज्ञात आरोपींनी पळ काढला होता. यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर घटनेत वाईन शॉपचा मॅनेजर भिकन जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर लक्ष्मण मोरे गंभीर जखमी झाले होते. 12 मे 2019 रोजी रात्री दहा वाजता सिल्लोड शहरातील जय भवानी नगर भागात ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपींचा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेतला आहे. जवळपास ७ महिन्यांनंतर या घटनेतील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
चेतन अशोक गायकवाड (वय 26 रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड) व त्याचा साथीदार अजय गुलाबराव रगडे (वय 30 रा. सातारा परिसर औरंगाबाद) तसेच संदीप आसाराम गायकवाड (वय 26 रा. परतूर जिल्हा जालना) असे आरोपींचे नावे आहेत. या तिघांनी मिळून सिल्लोड येथील वाईन शॉपचा मॅनेजर भिकन निळोबा जाधव यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केला होता. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पळ काढला होता. आरोपींकडून 24 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.