कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बांग्लामुक्ती लढय़ातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ कराड येथे गेल्या 24 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विजय दिवस समारोहाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त विजय दिवस समारोहात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळ्य़ासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनी येथे आज दिली.
विजय दिवस समारोह समीतीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समितीचे विनायक विभुते, प्रा. बी. एस. खोत, सहसचीव विलासराव जाधव, रमेश जाधव आदी उपस्थित होते. कर्नल पाटील म्हणाले, विजय दिवस समारोह समितीतर्फे दि. 13 डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता शोभा यात्रा निघेल. त्यामध्ये शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालयांचे चित्ररथ सहभागी होती. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चित्ररथ केला जाणार आहे. एसजीएम कॉलेजच्या वुमन्स मिल्ट्री अॅकॅडमीचाही चित्ररथ असेल. त्यादिवशी रात्री स्थानिक कलाकारांचा विशेष कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात होईल. दि. 14 डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता यशवंतराव चव्हाण समाधी परिसरातील बागेत चित्रकला स्पर्धा होईल. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता रक्तदान शिबीराचे उदघाटन होईल. त्यानंतर दुपारी एक वाजता सातारा, सांगली जिल्ह्यातील माजी सैनिक, विरपत्नी, विरमाता यांचे संमेलन होईल. त्यास सैन्यदलाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित राहतील. यंदा वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा विशेष सन्मान या संमेलनात केला जाईल. दि. 15 डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता एकत्मता दौड काढण्यात येईल. त्यात चार हजार विद्यार्थी, नागरीक, महिला, युवक-युवती, सैन्यदलाचे जवान सहभागी होतील. सायंकाळी सहा वाजता जीवन गौरव यशवंत पुरस्काराच वितरण होईल. त्याच कार्यक्रमात साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांना विजय दिवस समतीतर्फे विशेष सत्कार करण्यात येईल.
दि. 16 डिसेंबरला समारोहाचा मुख्य दिवस आहे. सकाळी साडेआठ वाजता तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी समितीतर्फे कोल्हापुरचे शाहु महाराज, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील मी, ब्रिगेडीयर जेम्स थॉमस अभिवादन करतील. दुपारी अडीच ते साडेपाच वाजेपर्यंत समारोहाचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर होईल. त्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांना उपस्थितीसंदर्भात निमंत्रण देण्यात आले आहे.