सांगली | “राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे. मात्र शिवसेना हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. जयंत पाटील यांना कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी उपस्थितांची माफी मागितली. राज्यमंत्री विश्वजित कदम यांची वाट बघत बसावं लागलं आणि कार्यक्रम सुरू व्हायला वेळ लागला असं सांगताना जयंत पाटील यांची मिश्किलपणे टिप्पणी केली.
“कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला. तुम्हा सर्वांना बराच वेळ वाट पाहत बसावं लागलं. मी राज्यमंत्र्यांची वाट पाहत बसलो होतो. ते आल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन होईल. मला वाटलं होतं आपण सर्वात शेवटी पोहोचू. उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे. वेळेचं आणि माझं चांगलं जमतं,” असं यावेळी जयंत पाटील म्हणाले. “राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे. मात्र धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकायला लागली आहे,” असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांनाही लगेच छापू नका असंही म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “धनुष्यबाण, घड्याळ आणि हात एकत्रित आल्यापासून या जिल्ह्यात सहकार क्षेत्राच चांगली ताकद निर्माण झाली आहे. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे”.
भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी दुःखद निधन झालं. त्यानंतर राज्य सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसंच आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, बँकेचे संचालक उपस्थित होते. दोन दिवस दुखवटा जाहीर केला असतानाही सांगलीमध्ये पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम पार पडला.