हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते नितेश राणे यांना अखेर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाच्यावतीने 30 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी न्यायालयाने त्यांना काही अटीही घालून दिल्या आहेत.
कणकवली सत्र न्यायालयाने शुक्रवारी नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी तब्येत बिघडल्यामुळे नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात यावे, असा अर्ज तुरुंग अधीक्षकांना पाठवला होता. ही मागणी मान्य करत नितेश राणे यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यानंतर न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला.
संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. यापूर्वी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी कणकवली दिवाणी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करुन जामिनासाठी अर्ज केला होता.
नेमके काय आहे प्रकरण?
18 डिसेंबर 2021 रोजी कणकवली शहरातील नरडवे तिठा येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयित आरोपी अटक केल्यानंतर तपासाची सुई आमदार नितेश राणे यांच्याकडे गेली होती. त्यामुळं कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्यावतीनं जिल्हा न्यायालयात 27 डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर 28 व 29 रोजी सुनावणी झाल त्यानंतर कोर्टानं निकाल राखून ठेवण्यात आला होता.