सिंधुदुर्ग प्रतिनिधी । वेंगुर्ला मातोंड- पेंडूर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उत्साहात पार पडला. ही जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.या निमित्ताने सकाळपासून केळी ठेवणे, नवस फेडणे,नवस बोलणे आदी कार्यक्रम पार पाडले जातात.
दक्षिण कोकणातील प्रसिध्द देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे. ३६० चाळयांचा अधिपती, भूत पीशाच्चगण यांचा नायक म्हणून त्याचा येथे वास असतो, अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे. विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानची ख्याती सर्वदूर आहे.
शरीराच्या कुठल्याही अवयवाचं दुखणं असेल, तर येथे नवस बोलतात. हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते. देशभरातुन भाविक या देवाच्या चरणी नवस बोलण्यासाठी येतात. तसेच जत्रोत्सवासाठी गोवा, मुंबई, बेळगाव आदी भागातून भाविक येतात.