सातारा | सिंहगड लाॅ काॅलेज परिसरात बुधवारी रात्री कोयता गॅंगच्या दोघांनी दहशत माजवत धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी सिंघम स्टाईलमध्ये चोप देत संशयित आरोपींनी धु…धु…धुतले. या पोलिस कर्मचाऱ्याचे आता नागरिकांच्यातून काैतुक होत आहे. संशयितांना सिंघम स्टाईल चोप देणारे अक्षय विठ्ठल इंगवले हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर या सातारकर अक्षयचे काैतुक होवू लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील किडगाव गावचे सुपुत्र पुणे जिल्हा पोलिस अक्षय विठ्ठल इंगवले पुणे येथे कर्तव्य बजावत आहेत. दोन दिवसापूर्वी स्थानिक गुंडानी पुण्यातील आंबेगाव परिसरात दुकानदारांना कोयत्याची दहशत दाखवून फोडली. तसेच लोकांवरही कोयत्याने वार केल्याची खबर कळताच घटनास्थळी काही वेळेत पोहचून अक्षय व त्यांच्या पोलिस सहकाऱ्याने त्या गुंडांचा भर चौकात चोप देत चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर संशयितास अटकही केली. पोलिसांनी केलेल्या धाडसी कृत्याच सर्व स्तरांमधून व समाज माध्यामांमधून कौतुक होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात देखील कोरोनाग्रस्त रुग्णवाहिका अपघातामध्ये पलटी झाली होती. तेव्हा आपल्या जीवाची परवा न करता सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचवल्याने म्हणून तत्कालीन गृहमंत्री यांनी अक्षय इंगवले यांच्या धाडसाचे कौतुक केले होते.
पुण्यात सिंहगड विधी महाविद्यालय, आंबेगाव परिसरात 28 डिसेंबर रोजी रात्रीच्यावेळी कोयता गँगच्या दोन सदस्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गँगमधील सदस्यांनी हातात कोयता घेत लोकांवर हल्ला केला. तसेच वाहनांच्या काचाही फोडल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी काही लोकांनी आपल्या मोबाईल मधील कॅमेऱ्यात त्यांच्या दहशतीचे चित्रीकरण केले. तर काही स्थानिक नागरिकांनी घडलेल्या घटनेची माहिती हद्दीतील पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील व अक्षय इंगवले या दोघांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हल्लेखोरांचा पाठलाग करून त्यांना पकडले. मात्र, त्यातील एका अल्पवयीन मुलगा त्यांच्या हाती लागला तर दुसरा करण दळवी नावाचा सदस्य निसटून गेला. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला भर रस्त्यात नागरिकांसमोर आणून बेदम चोप दिला. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, असून पुढील तपास सुरू आहे.