विटा | आळसंद (ता. खानापूर) येथे मण्यार जातीच्या सर्पाने दंश केल्याने सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात विराज सुनील कदम (वय- 16) या युवकाचा झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. तर माहेरी आलेल्या बहीण सायली वृषभ जाधव (वय- 22) हिला दंश केला होता. ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.
भाळवणी रस्त्यावरील वस्तीवर सुनील कदम यांचे कुंटुब राहते. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर विराज यांच्यासह सर्वजण झोपले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मण्यार जातीच्या सापाने त्याला दंश केला. गुरुवारी सकाळी उठल्यावर त्याला त्रास होऊ लागला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला त्यामुळे त्याला प्रथम पलूस येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विराजच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याची विवाहित बहीण सायली जाधव गुरुवारी माहेरी आली होती. विराजच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी होता. गुरुवारी रात्री सर्वजण झोपले असताना घरात लपून बसलेल्या मण्यार सापाने सायलीला दंश केला. सायलीला विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर, तेथून सांगलीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सायलीचाही काल मृत्यू झाला. या घटनेने आळसंद गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.