पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी या ठिकाणी ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये त्या बसल्या. यानंतर तीव्र उतारावर ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर कोसळून जिजाबाई दुधवडे आणि भिमाबाई गांडाळ या दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. मंचर-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी हद्दीमध्ये हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशा प्रकारे घडला अपघात ?
आंबेगाव येथील निरगुडसर येथील महादू संभू वळसे यांच्या शेतातील ऊस तोडणी झाल्यानंतर ऊस ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आला. यानंतर ऊस विक्रीसाठी घेऊन जात असताना भरलेल्या ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे आणि भिमाबाई यादव गांडाळ या दोघी ट्रॅक्टरमध्ये बसल्या. यादरम्यान मेंगडेवाडी रस्त्याच्या तीव्र उतारावर ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. यावेळी हा ट्रॅक्टर दोघी बहिणींच्या अंगावर कोसळला. त्या दोघीही उसाखाली दाबल्या गेल्या. यामध्ये एका बहिणीचा जागेवरच मृत्यू झाला तर एका बहिणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मेंगडेवाडीतील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील साधारण चार किमी परिसरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. याअगोदरदेखील या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत.