सोलापूर प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्गाने बेजार झाला आहे.या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत.सोलापुरातसुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कोरोनाने सोलापुरात आजपर्यंत २२ जणांचे बळी घेतले आहेत.असे असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरात “कोविड १९” चे केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासकीय रुग्णालयातील ” ए ” ब्लॉकमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी आणले जाते.रुग्णांचे स्वब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात .रिपोर्ट येईपर्यंत निगेटिव्ह आणि पॉझिटीव्ह येणारे दोघेही एकत्र असल्यासारखे असतात. त्यानंतर निगेटिव्ह रुग्णांना अन्य आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या समवेत ठेवले जाते.त्याच दरम्यान एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह येतो.तत्पूर्वी दोन दिवस swab दिलेले रुग्ण अन्य जणांमध्ये मिसळलेले असतात आणि त्याची लागण इतरांना व रुग्णालयात सेवा देत असलेले डॉक्टर व नर्सेसला होऊन हकनाक कोरोनाचा फैलाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कालच दोन दिवसांपूर्वी swab दिलेल्या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.या कर्मचाऱ्याने या दरम्यान किती रुग्णांना सेवा दिली आहे.त्याच्यामुळे आणखी किती रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होईल याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच या सर्व प्रकाराकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी त्याची म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. परिणामी दररोज रुग्णांची संख्या वाढत जाऊन सामान्य माणसांचे बळी जात आहेत. शिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याचे माहिती असूनही त्यांना अन्यत्र विलीनीकरण कक्षात न ठेवता कामावर ठेवले जात आहे.
रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर,नर्सेस व अन्य वैधकीय मंडळींना मास्क,ग्लोव्हज आणि पीपीई किट देण्यात आल्या आहेत.परंतु त्या त्यांना देण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना दररोज हे साहित्य देणे बंधनकारक असताना सरकारकडून आलेले हे साहित्य नेमके जाते कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.सरकार आरोग्याच्या साहित्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना स्थानिक पातळीवर मात्र साहित्य संबंधीतांपर्यंत न पोहोचता त्याचा तुटवडा असल्याचे भासविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार तर आणखी भयंकर आहे.
इतकेच नव्हे तर swab तपासण्यासाठी ज्या दोन मशीन देण्यात आलेल्या आहेत त्याद्वारे दररोज जास्तीत जास्त रिपोर्ट येणे गरजेचे असताना तसे होताना दिसून येत नाही.यावरूनच रुग्णालयातील प्रयोगशाळेत पूर्ण क्षमतेने तपासणी होत नसल्याचे दिसून येते.आणि दररोज कोरोना बधितांचा आकडा वाढल्याचे दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांची व त्यामुळे होणाऱ्या मृतांची वाढती संख्या लक्षात सोलापुरात “कोविड १९”साठी कायमस्वरूपी केंद्र होणे गरजेचे आहे.त्यामुळे कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्यास काही प्रमाणात यश येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान सोलापुरात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना व कठीण काळात सोलापुरात राहणे गरजेचे असताना डॉ.वैशंपायन वैधकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर हे रजेवर गेले आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.सोलापुरात रुग्णांची संख्या वाढत असताना कोणीतरी आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून सोलापुरात राहणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या सावळागोंधळाची चौकशी करण्याची मागणीही सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केली आहे.