सांगली | सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील आठपैकी सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आदी उपस्थित होते.
संशयितांपैकी किरण उमाजी मलमे (वय 28, रा. एरंडोली) अमोल रमेश नाटेकर (22), अक्षय रामचंद्र चव्हाण (24, रा. दोघे तुपारी), सुनील सीताराम वडर (23), विजय संभाजी जाधव (24, रा. दोघे कुंडल), सूरज गणेश कोरडे (22, रा. ताकारी) या सहाजणांना अटक केली आहे. मिलिंद मुकुंद धेंडे (रा. एरंडोली, ता. मिरज) आणि विशाल कदम (रा. पलूस) यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पोलिस हवालदार सुनील चौधरी यांना माहिती मिळाली की कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन वर्षांपूर्वी कुंडलिक पांडुरंग वासूदकर यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्या दरोड्यातील संशयित पैसे आणि सोने वाटून घेण्यासाठी तुरची फाटा येथे आले आहेत. त्या ठिकाणी सापळा रचून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोन वर्षांपूर्वी कुकटोळी येथे दरोडा टाकल्याची कबुली त्यांनी दिली. वासुदकर यांनी त्यांची जमीन विकून आलेले 18 लाख 62 हजार रुपये घरात ठेवले होते. त्यांचे घर गावाबाहेर असल्याने तेथे फारशी वस्ती नाही. त्यामुळे संशयित त्यावेळी रात्री दोनच्या सुमारास कारमधून गेले.
घराचा दरवाजा तोडून घरातील लोकांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून पैसे व सोन्याचे दागिने चोरले होते. त्यांच्याकडे आणखी कोठे चोरी केली आहे काय याबाबत चौकशी केली. त्यावेळी आठ महिन्यांपूर्वी सावळी येथे एक घर फोडून सोन्याचे दागिने व पैसे लुटले असल्याचे त्यानी सांगितले. त्या गुन्ह्यातील पैसे वाटून घेतले होते. मात्र दागिन्यांची वाटणी करण्यासाठी ते एकत्र आले होते.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम 30 हजार 100 रुपये, 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी, पाच मोबाईल असा एकूण 1 लाख 77 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांनी सातारा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दरोडे घातले आहेत. त्यात एकाचा खून झाला आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांची कारागृहात ओळख होऊन त्यांनी कट रचून हे प्रकार केले असण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, पोलिस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, मारुती साळुंखे, सुनिल चौधरी, मच्छिंद्र बर्डे, जितेंद्र जाधव, राहुल जाधव, कुंबेर खोत, अजय बेंदरे, गजानन गस्ते, महादेव नागणे, मुदस्सर पाथरवट, शशिकांत जाधव, सचिन कनप, अरुण सोकटे यांनी ही कारवाई केली.