औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधून अनेक कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. ही अत्यंत दिलासादायक बाब असून येणाऱ्या काळातही साथ रोगासाठी हे रुग्णालय कार्यरत राहील. अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी दिली. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कोविड सेंटर मध्ये एकही रुग्णांने प्राण गमावले नाही. डॉक्टरांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे यश आहे असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीच्या काळात महापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसाठी जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. या डॉक्टरांचा पांडेय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यांपैकी काही डॉक्टरांनी आणि बरे झालेल्या रुग्णांनी मनोगत व्यक्त केले. वर्षभरात मेल्ट्रॉनमध्ये 7 हजार 400 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी सहा हजार पाचशे रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर इतर रुग्ण पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पांडेय म्हणाले की, “मेल्ट्रॉन रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी चांगल्या सोयीसुविधा औषधोपचार जेवण्याची उत्तम सोय डॉक्टरांचे चांगली टीम आहे. कदाचित कोरोनाची तिसरी लाट आली तरी मेल्ट्रॉन रुग्णालय सज्ज असून सर्व चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील” अशी खात्री व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला शहर अभियंता एच.डी. पानझडे, नंदकुमार बॉम्बे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर, उपायुक्त अपर्णा थेटे, डॉ. वैशाली मुदगडकर, डॉ. बाळकृष्ण राठोडकर, ज्योती अमोलिक, आरएमओ डॉ. शुभम तनपुरे, डॉ. नोहेल यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.