सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे इंटरनेट स्वस्त दरात उपलब्ध झाले. स्वस्त दरातील स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाले. इंटरनेट आणि स्मार्टफोन या दोन मुख्य गरजा पूर्ण झाल्यानंतर सोशलमीडिया वापरण्याच्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात झाली. जिओच्या आगमनामुळे तर यामध्ये अजूनच भर पडली. सुरवातीला फक्त फेसबुकवर फोटो अपलोड करणे, ओळखीचे अनोळखीचे मित्र जोडणे, त्यांच्याशी चॅटिंग करणे एवढ्या पुरते फेसबुकला मर्यादित ठेवण्यात आले मात्र कालांतराने यामध्ये विविध बदल झाले.
युजरच्या आवडीप्रमाणे फेसबुकने देखील फिचर बदलायला सुरवात केली. तरुण पिढीला अभिव्यक्त होण्यासाठी सोशलमडिया जवळचा वाटू लागला. मातृभाषेतून तरुणाई व्यक्त होऊ लागली. स्वतःची सामाजिक, राजकीय मतं बिंधास्त मांडू लागली. सामाजिक आणि राजकीय घडामोडीत आवड असणारी तरुणाई यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिली. या सोशलमीडियामुळे तरुणाईला व्यक्त होण्यासाठी चांगले आणि खुले व्यासपीठ उपलब्ध झाले.
कवी, लेखक,फोटोग्राफर, कलाकार मंडळीने सोशलमीडियाचा व्यक्त होण्यासाठी खुबीने वापर केला. एकप्रकारे सोशलमडियातून तरुणाईच्या अभिव्यक्तीचा विस्फोट घडून आला. आपल्या पोस्टला सर्वाधिक लाईक कसे मिळतील यासाठी स्पर्धा सुरू झाली. अनेकांनी फेसबुक सारख्या माध्यमातून नवनवीन मित्र जोडले. विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. एकमेकांतील अंतर कमी झाले. व्यक्त होण्यासाठी कोणतंही बंधन नसल्यामुळे तरुणाईच्या आत दडलेल्या भावना, विचार यांना वाट मोकळी झाली. सेक्स, प्रेम यांसारख्या विषयावर आजही या समाजात बिंधास्तपणे बोलता येत नाही मात्र सोशलमीडियामुळे समाजात दबल्या गेलेल्या यांसारख्या विषयावर तरुणाई व्यक्त होऊ लागली. हा फार महत्वाचा बदल घडून आला. ज्यांना लेखनातून व्यक्त व्हायचे होते त्यांनी फेसबूकचा आधार घेतला तर ज्यांना बोलून व्यक्त व्हायचे होते त्यांनी युट्युबसारख्या माध्यमाचा वापर केला. काहींनी स्वतःचे युट्युब चॅनेल काढले.
ध्रुव राठी या 21 वर्षीय तरुणाने स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले आणि त्या चॅनेलच्या माध्यमातून तो चालू घडामोडींवर विश्लेषणात्मक व्हिडीओ तयार करू लागला. त्याच्या या व्हिडीओंना अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद लाभला. त्याचे सध्या 2.5 मिलियन एवढे सबस्क्राईबर आहेत. मैथिली ठाकूर ही तरुण गायिका सोशलमीडियामुळे प्रसिद्धीस आली. युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप या माध्यमातून तिच्या गाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि तिच्या प्रतिभेला प्रेक्षकांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला, मिळतोय. सोशलमीडियामुळे तरुणाईच्या अभिव्यक्तीला चालना मिळाली आणि यामुळे तरुणाईमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत झाली. व्यक्तीच्या व्यक्तीमत्व विकासासाठी व्यक्त होणं खूप गरजेचं असतं.
सोशल मीडियाने व्यक्त होण्याच्या संधी दिल्यामुळे अनेकांचा व्यक्तिमत्व विकास घडून आला. सोशलमीडियाने या तरुणाईला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मोलाची मदत केली. पूर्वी एखादी व्यक्ती मोठ्या पडद्यावर झळकली की सेलेब्रिटी होऊन जायची मात्र आता या सोशलमीडियामुळे अनेकांना सेलेब्रिटी बनवले. ‘फेसबुक सेलेब्रिटी’ हा नवीन वर्ग उदयास आलेला आहे. सोशलमीडियामुळे अनेकांना जॉब मिळण्यास देखील मदत झाली आहे. विविध क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती सोशलमीडियामुळे सहज उपलब्ध होत आहे. सोशलमीडिया म्हणजे फक्त मनोरंजन, टाईमपास असं चित्र आता राहिलेलं नाही.
अण्णा हजारे यांचे आंदोलन असो की निर्भया बलात्कारानंतर देशभर उभा राहिलेले आंदोलन. ही आंदोलने उभा करण्यासाठी सोशलमीडियाचा महत्वाचा वाटा होता. ट्विटर, फेसबुकवरून या आंदोलनासंबंधी पोस्ट लिहिल्या गेल्या. हॅशटॅग वापरण्यात आले यामुळे या विषयाशी संबंधित लोकं जोडले गेले आणि आंदोलन व्यापक होण्यास मदत झाली. हे सगळं घडवून आणण्यात तरुण पिढीचा महत्वाचा वाटा होता. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यामध्ये तरुण पिढीने पुढाकार घेतला. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या तरुणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सोशलमीडिया चा वापर झाला. ट्विटरवरून मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करून पुराच्या पाण्यात लोकं कोणत्या ठिकाणी अडकले आहेत याची माहिती देण्यात आली. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यास तरुणाई नेहमीच पुढे राहिली आहे.
सोशलमीडियाला काहीजण आभासी, काल्पनिक जग असं संबोधतात पण मला तसं वाटत नाही. सोशलमीडिया हा एक प्रकारे समाजाचेच प्रतिबिंब दाखवतो. समाजातील बऱ्या वाईट प्रवृत्तीच दर्शन सोशलमीडियावर घडतं. समाजात जसे वादविवाद होतात तसे वादविवाद सोशलमीडियावर देखील घडतात. काही वेळा हे वाद पोलीस स्टेशनपर्यंत देखील जातात. माझ्या एका मित्राने आदिवासी समाज सेक्स या विषयी कसा उदारमतवादी आहे याविषयी एका पोस्टखाली कमेंट केली. त्याच्या या उदारमतवादी कमेंटमुळे काही आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्या माझ्या मित्रावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळी बाळासाहेबांच्या निधनानंतर घडलेली घटना आवर्जून आठवते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. त्या मुंबई बंद विरुद्ध एका तरुणीने फेसबुक पोस्ट द्वारे आक्षेप नोंदविला होता. त्यावेळेस तिला आणि ती पोस्ट लाईक करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला आयटी ऍक्ट 66 अ नुसार अटक करण्यात आली होती. या कलमानुसार सोशलमीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करता येत होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या या कलमाविरुद्ध दिल्लीतील लॉची विद्यार्थिनी श्रेया सिंगलने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च 2015 रोजी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हे जाचक कलम रद्द केले. या प्रकरणावरून आजची तरुणाई आपल्या हक्कांबाबत किती जागरूक आहे हे दिसून येतं. मात्र तरुणाईने जबाबदारीने सोशलमीडियाचा वापर करायला हवा अशी अपेक्षा आपला समाज व्यक्त करतो.
जातीय संघर्ष जसा समाजात दिसून येतो तसा तो सोशलमीडियावर देखील दिसून येतो. समाजात जसा तरुणींचा लैंगिक छळ केला जातो तसा तो सोशलमीडियावर देखील केला जातो. अश्लील मेसेज सेंड करून तरुणींना त्रास दिला जातो. विनाकारण मेसेज केले जातात. अनोखळी व्यक्ती आय लव्ह यु बोलून जाते. एकप्रकारे तरुणींचा ऑनलाइन लैंगिक छळ केला जातो. या छळाचा सामना करत काही तरुणी सोशलमीडियावर बिंधास्तपणे व्यक्त होतात तर काही स्वतःवरच बंधनं लादून घेतात. अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या चाहत्यांशी लाईव्ह संवाद साधताना मराठी भाषेविषयी मत व्यक्त केले. तिचे ते मतं व्हिडीओद्वारे सोशलमीडियावर व्हायरल झाले. ते मतं काहींना पटले नसल्यामुळे अत्यंत अश्लील भाषेत अभिनेत्री केतकी चितळेला ट्रोल करण्यात आले. नंतर तिने एका व्हिडीओ द्वारे या ट्रोलर्सचा समाचार घेतला. अशाप्रकारे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुणींना ट्रोल केले जाते. तरुणाईचा विकृत चेहराच अशा प्रसंगी समोर येतो. या सोशलमीडियामुळे तरुणाई प्रतिक्रियावादी झाल्याचे दिसून येते. काही अपवाद सोडले तर बरेच जण एखाद्या घटनेवर विचारपूर्वक व्यक्त होताना दिसत नाही. उथळपणे व्यक्त होणाऱ्या तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे जाणवते. आपण सोशलमीडियावर केलेली कृती, मांडलेलं मत अनेकजण पाहत असतात. त्यामुळे सोशलमीडियावर व्यक्त होताना तरुणाईने जबाबदारीने व्यक्त होणं गरजेचं आहे.
सोशलमीडियाच्या गैरवापरामुळे अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत. 12 वीत शिकणाऱ्या मुलीचा तिच्या मित्रासोबत बोलतानाचा व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाला तर त्या मुलीने आपली बदनामी होईल या भीतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. काहींनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केल्या. प्रेयसीचे दुसऱ्यासोबत लग्न ठरल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने चक्क मंदिरातूनच आत्महत्या करत असल्याचे फेसबुक लाईव्ह केले. सोशलमीडियाच्या अतिवापरामुळे अनेकांना नैराश्याला सामोरे जावे लागले आहे. लेखनाच्या माध्यमातून, मेसेजद्वारे सोशलमीडियावरून मोठ्या प्रमाणात संवाद साधला जातो पण प्रत्येकवेळी असा संवाद यशस्वी ठरतोच असं नाही. मेसेजरूपी संवादामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यामुळे मैत्री जोडणारा हा सोशलमीडिया मैत्री तोडण्यास देखील कारणीभूत ठरला आहे. एखाद्या व्यक्तीविषयी चुकीची माहिती पसरविण्यासाठी तसेच व्यक्तीला बदनाम करण्यासाठी सोशलमीडियाचा वापर केला जातो. या चुकीची माहितीवर अनेकजण विश्वास ठेवून स्वतःच मत तयार करतात. उदा. देशाची फाळणी होण्यासाठी महात्मा गांधीजी कसे जबाबदार आहेत हे सांगणारे मेसेज सोशीलमीडियातून पसरवले जातात. असा खोटा इतिहास वाचून अनेक तरुण आपलं मत तयार करतात. अशावेळी खरा इतिहास समजून घेणे आणि तो सोशलमीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहचवणे ही आजच्या तरुणाईची जबाबदारी आहे.
आज देशात कोणतीही महत्वाची घटना घडल्यास त्याचे पडसाद पहिल्यांदा सोशलमीडिया उमटताना दिसतात. त्या घटनेविषयी चर्चा सोशलमीडियाच्या माध्यमातून घडून येते. ही चर्चा करण्यास तरुणाई आघाडीवर राहिली आहे. अशा चर्चेतून समाजाला योग्य दिशा मिळते.अशा चर्चा करण्यासाठी तरुणाईने वाचन,चिंतन इत्यादींच्या माध्यमातून अधिकाधिक परिपक्व होणे गरजेचे आहे. सोशलमीडियावर तरुण पिढीबरोबरच जुनी पिढी देखील सक्रिय आहे. तरुण पिढीच्या तुलनेने जुन्या पिढीच सोशलमीडियावर व्यक्त होण्याच प्रमाण कमी आहे. ही जुनी पिढी व्यक्त होतं नसली तरी तरुण पिढी सोशीलमीडियावर काय काय करते याच्यावर बारीक लक्ष्य ठेऊन असते.एकप्रकारे ही मंडळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेच काम करत असतात.
सोशलमीडियावर टाकलेली पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अगदी वाऱ्यासारख्या पोस्ट व्हायरल होत असतात. अशा या व्हायरल जगात तरुणाईने आक्रमकतेला थारा न देता संयम ठेऊन विवेकी वृत्तीने व्यक्त होणं गरजेच आहे.
– मयूर डुमणे (मोबाईल नं- 7775957150)