सोलापूर प्रतिनिधी । शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 102 झाली असून, आज एका दिवसात 21 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. बैठक संपल्यानंतर त्यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसराला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
ताज्या आकडेवारीनुसार सोलापुर जिल्ह्यात सध्या 102 कोरोनाबाधित असून त्यापैकी 06 जणांचा मृत्यू झालेला आहे. सोलापुरात कोरोना चाचणीची संख्या अधिक असल्याने अधिक रुग्ण सापडत आहेत. यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना चाचणी रिपोर्ट आता पॉझिटिव्ह येत असून आता पॉझीटीव्ह येत असलेले रुग्णाना प्रशासनाने पूर्वीपासूनच उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी काळजी करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.