हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा…. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सोलापूरचा गड (Solapur Lok Sabha 2024) मोदी लाटेत भाजपकडे आला अन अजूनही तो तसाच कायम आहे. यंदा काहीही करून सोलापुरात काँग्रेसचा झेंडा फडकवायचाच असा चंग बांधून काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सलग ३ टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपनेही पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असलेले माळशिरसचे आमदार राम सातपुते याना सोलापूर लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे दोन्ही युवा नेत्यांमधील सामना अतिशय रंगतदार होणार हे नक्की…. अशा परिस्थितीत सोलापुरात भाजप आपला गड राखणार?? कि प्रणिती शिंदे राम सातपुते याना चितपट करणार? याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. एवढच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही सोलापुरात उमेदवार उभा केल्याने नेमकी गेम कोणाची होणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना 1952 मध्ये झाली. तेव्हापासून या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे. 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सोलापूर लोकसभा मतदार राखीव मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आला. त्यावेळी जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे निवडून आले. पण 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करत सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पुढे २०१९ मध्येही सुशीलकुमार शिंदे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यावेळी शिंदे यांचे प्रतिस्पर्धी होते ते भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी… २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचीतचे प्रकाश आंबेडकर स्वतः सोलापुरात निवडणुकीच्या रिंगणात होते. आंबेडकरांनी 1,70,007 मते सोलापुरातून घेतली आणि त्याचा थेट फटका सुशीलकुमार शिंदे याना बसला होता.
यंदाच्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सलग तीन टर्म सोलापूर मध्यच्या आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचं नाव आघाडीवर होते. पक्षानेही प्रणिती यांच्या उमेदवारीवर कोणताही आक्षेप न घेता तिकीट दिले आणि सोलापूरचा बालेकिल्ला पुन्हा एकदा खेचून आणण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकलं. शिंदे घराण्याचा वारसा, भाजपविरोधात आक्रमक भूमिका,युवकांमध्ये असलेलं प्रचंड आकर्षण आणि आमदार म्हणून केलेली विकासकामे हि प्रणिती शिंदे यांची बलस्थाने मानली जात आहेत. त्यातच माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घरवापसी केल्यामुळे प्रणिती शिंदे यांचं बळ वाढलं आहे. तर दुसरीकडे राम सातपुते हे सध्याचे माळशिरसचे आमदार आहेत. त्यातही देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्यातील… त्यांचे वडील ऊसतोड कामगार होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब माळशिरससारख्या ऊस पट्ट्यात आले आणि इथेच स्थायिक झाले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना राम सातपुते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. तेव्हापासून त्यांनी सक्रियपणे विद्यार्थी संघटनेचे काम केले.राम सातपुते (Ram Satpute) यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आणि ते विजयी सुद्धा झाले होते. आता कोणाच्या ध्यानी मनी नसताना भाजपने त्यांना थेट सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे, पण “बाहेरचा उमेदवार” असं म्हणत विरोधकांनी राम सातपुते यांच्या विरुद्ध प्रचार केला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा ६ विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत येतो. यातील सोलापूर उत्तरचे प्रतिनिधित्व भाजपचे विजयकुमार देशमुख, सोलापूर मध्य प्रणिती शिंदे, सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे सुभाष देशमुख, मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने, अक्कलकोट येथून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आणि पंढरपूर मध्ये भाजपचेच समाधान अवताडे हे विद्यमान आमदार आहेत. म्हणजेच सोलापूर लोकसभा अंतर्गत भाजपचे ४, काँग्रेसचा एक आणि अजित पवार गटाचा १ आमदार आहे. याचाच अर्थ कागदावर तरी राम सातपुते यांचे पारडे जड वाटत आहे.
दुसरीकडे, सोलापुरातील जातीचे समीकरण पाहायचे झाल्यास, सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा लिंगायत बहुल मतदारसंघ आहे. त्यानंतर पद्मशाली समाज, मुस्लीम अनुसूचित जाती, धनगर समाज यांचा क्रमांक येतो. इथला लिंगायत समाज परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करत आला आहे. तर मुस्लिम आणि दलित समाज काँग्रेसची व्होटबँक आहे. परंतु २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन निवडणुकीचा निकाल भाजपच्या पथ्यावर पडला. आताही महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गायकवाड यांना वंचितकडून सोलापूरमधून उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे याना मतदानापूर्वीच धक्का मानला जात आहे. तुम्हाला काय वाटत? वंचितच्या या भूमिकेमुळे २०१९ प्रमाणेच भाजपला फायदा होणार? कि सर्वाना पुरून उरून प्रणिती शिंदे काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा एकदा परत मिळवणार? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा