सोलापूर प्रतिनिधी । आजपर्यंत सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. सांगोला तालुक्यात कोरोना बाधित व्यक्ती आढळला असून या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सांगोला तालुक्यातील घेरडीमध्ये हा रुग्ण असल्याचे समजते.
सोलापूर जिल्ह्यात आज नव्याने सापडलेल्या नऊ रुग्णांमध्ये पाच रुग्ण हे सारीचे आहेत आणि उर्वरित रुग्ण हे कोरोनाचे आहेत. नव्याने सापडलेल्या नऊ रुग्णांमध्ये चार रुग्ण हे शांतीनगर परिसरातील, एक रुग्ण कुमठा नाका परिसरातील, एक रुग्ण लष्कर परिसरातील, दोन रुग्ण मोदीखाना परिसरातील, एक रुग्ण सांगोला तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आज दिवसभरात 82 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 73 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात आढळलेल्या पन्नास कोरोना बाधित व्यक्तींपैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित 46 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्यापही 152 जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.