खाऊगल्ली | उन्हाचा जोर वाढतच चाललंय यावेळी काहीतरी थंड प्याव असे सर्वांनाच वाटते. यासाठी सोलकढी हा उत्तम पर्याय असू शकतो. त्यातच सोलकढी ही पित्तशामक असल्याने आरोग्यास फायदेशीर आहे. तसेच ही कढी पाचक असल्याने जेवणानंतर प्यायला किंवा भातावर घ्यायला छान लागते.कोकणात मासे किंवा चिकन-मटणाचा बेत असेल तर हमखास सोलकढी करतात.
साहित्य –
१) ताज्या नारळाचं दूध २ काप
२)१०-१२ सोल आमसूल किंवा कोकम
३) १ हिरवी मिरची
४) १-२ लसूण पाकळ्या
५) २ चमचे साखर
६) मीठ
७) कोथिंबीर
८) जिरे पूड १/२ चमचा
कृती –
एक कप ताज्या खोबऱ्याचे तुकडे आणि एक कप पाणी मिक्सरला फिरवून घ्या. ही प्युरी सुती कापडातून गाळून घेऊन त्यातून नारळाचं दूध काढा. साधारण एका नारळातून २ काप दूध निघते. गरम पाण्यात अर्धा तास कोकम किंवा आमसूल भिजत घालावे म्हणजे त्याचा अर्क पाण्यात उतरेल. ते कुस्करून त्याचे पाणी गाळून घ्यावे ते पाणी नारळाच्या दुधात टाकावे.
नारळाच्या दुधात नंतर साखर, मीठ ,ठेचलेला लसूण, जिरे पूड आणि मिरचीचे तुकडे घालून ढवळून घ्यावे.वरून बारीक चिरलेली काथिंबीर घाला. ही कढी फ्रिज मध्ये ठेऊन थंड करा आणि हवी तेव्हा प्या.
( टीप – मधुमेह असलेल्या लोकांनी १ ग्लास सोलकढी पिणंफायदेशीर आहे. )