सातारा प्रतिनिधी
तरुणाईला व्यक्त व्हायला,कृती करायला योग्य जागा मिळाली की काय किमया घडते याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना घडला. यंदाची धूळवड, येथील तरुणाईने रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्रे साकारुन साजरी केली.अमृत एकता मंडळाचे युवा कार्यकर्ते आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशीच शाळेच्या भिंती स्वच्छ करुन कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. शुक्रवारी सकाळी आठ वाजता शाळेच्या भिंतींचे रुप पालटायला सुरुवात झाली.
अरविंद गवळी कॉलेजचे विद्यार्थी आणि गावातील तरुणांनी चित्रे साकारताच रुक्ष भिंती जीवंत भासू लागल्या. तरुणांचा उत्साह पाहून शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी चहा – नाश्त्यापासून अगदी सुग्रास जेवणाची शाळेतच सोय केली. दुपारनंतर जसजसे चित्रात रंग भरले जाऊ लागले तशी शाळेच्या परिसरात चित्रे पहायला लोकांनी गर्दी केली.या उपक्रमाची संकल्पना आणि संयोजन सांस फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सत्यशील शिंदे यांनी केले. तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध युवा चित्रकार अनिकेत जऱ्हड, वैभव ठाकरे उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा शिंदे,श्री.श्रीकांत माने,सौ. रेखा शेलार,अर्चना कोळसुरे यांच्या सह सर्वच शिक्षकांनी चित्रांची निवड, रचना करण्या सोबतच चित्रांमधे रंग भरून उपस्थिताचा उत्साह वाढवला.रामनगरचे नव निर्वाचित युवा सरपंच श्री. अमोल गोगावले यांनी विधायक कामांसाठी तरुणाईचा जोश आणि उत्साह वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उपक्रमाची सांगता सातारा शिक्षक बँकेचे संचालक श्री दत्तात्रय कोरडे यांनी सर्वांचे आभार मानून केली.