जत : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सोनलगी याठिकाणी बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी तरुणाने किरकोळ कारणातून आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. वडील हे आपल्या बायकोसमोर सतत शिवीगाळ करत अपमान करतात, हा राग मनात धरून आरोपी मुलाने आपल्या जन्मदात्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
शिवाप्पा चंद्रराम पुजारी असं हत्या झालेल्या 70 वर्षीय वडिलांचं नाव आहे तर मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. मृत शिवाप्पा पुजारी हे जत तालुक्यातील सोनलगी येथील सिद्धेरामेश्वर मंदिराचे पुजारी होते. ते आपल्या पत्नीसोबत राहत होते. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे पण सध्या ते सगळे वेगवेगळे राहतात.
मृत शिवाप्पा पुजारी यांना दारू पिण्याचं व्यसन होतं. ते दररोज दारू पिऊन आपला मुलगा मल्लिकार्जुन याला शिवीगाळ आणि मारहाण करत होते. त्यांनी अनेकदा मल्लिकार्जुनच्या पत्नीसमोर त्याचा अपमान आणि मारहाण केली होती. त्यामुळे आरोपी मुलगा मल्लिकार्जुनच्या मनात वडिलांबद्दल राग होता. घटनेच्या दिवशी मृत शिवाप्पा यांचे मुलगा मल्लिकार्जुनच्या पत्नीसोबत भांडण झालं होतं. हे भांडण एवढे विकोपाला गेले कि रागाच्या भरात मल्लिकार्जुनने आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. हा हल्ला एवढा जोरदार होता कि शिवाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील किरकोळ कारणातून झालेल्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.