सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
वाळवा तालुक्यातील वाकुर्डे येथील लक्ष्मण पाटील-वाघमारे याने मुलाने आपल्या जनदात्या पित्याचा दारूच्या नशेत म्हैस विक्रीतुन आलेले पैसे दिले नसल्याच्या कारणावरून वडील हरी पाटील-वाघमारे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत निर्घृण खून केल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी चिकुर्डे येथील पोलीस पाटील सुधीर कांबळे यांनी कुरळप पोलिसात फिर्याद दिली असून वयोवृद्ध वडिलांचा खून करणाऱ्या नराधम पुत्रास पोलिसांनी अटक केली आहे.
लक्ष्मण पाटील-वाघमारे हा वडील हरी व आई ताराबाई पाटील-वाघमारे यांच्यासोबत चिकुर्डे येथील टाकळी वसाहत मध्ये वास्तव्यास होता. लक्ष्मण याला बऱ्याच वर्षापासून दारूचे व्यसन होते. त्यामुळे वेळोवेळी आई वडिलांना तो पैशांसाठी मारहाण करत होता. हरी पाटील यांना गेल्या चार वर्षापासून अर्धांगवायू झाल्याने ते अंथरुणात झोपून होते. पती आजारी असल्याने पत्नी ताराबाई यांनी म्हैस विकली होती. त्यातील १० हजार रुपयांची लक्ष्मणने आईकडे मागणी केली असता आईने दहा हजार रुपये देण्यास नकार दिला. आईने पैसेदेण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या लक्ष्मण याने काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन वडील झोपले असताना लाकडी दांडक्याने पाठीवर डोक्यात व हातापायावर बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
मुलगा आपल्या पतीला मारहाण करत असल्याचे पाहून आईने आराडाओरड करण्यास सुरवात केली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची एकाच गर्दी झाली. काही गावकऱ्यांनी या घटनेची माहिती कुरळप पोलिसांना दिली. कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, उपनिरीक्षक सुनील भिसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी हरी पाटील कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. हरी पाटील यांना जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. अखेर त्यांचा रात्री दोन वाजन्याच्या सुमारास मृत्यू झाला.
या प्रकरणी मुलगा लक्ष्मण याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान लक्ष्मण याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून. दारूच्या व्यसनामुळे व सततच्या भांडनाला वैतागून लक्ष्मणाची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.