घरगुती वादातून गडचिरोलीत मुलाने केला जन्मदात्या बापाचाच खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोली शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतर असलेल्या विसापूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापावर कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे. काल संध्याकाळी हि धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मृत व्यक्तीचे नाव दामोदर भिकाजी तांगडे असे आहे तर आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे असे आहे. आरोपी हा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असताना गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवला.

मोठा मुलगा पोलिस खात्यात कामाला
मृत दामोदर भिकाजी तांगडे यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी 60 या पथकात कार्यरत आहे. तर लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता. तो घरीच राहत होता. यामुळे आरोपी तेजस आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडण होत होते. याच वादातून आरोपी तेजसने रागाच्या भरात वडिलांचा खून केला. आरोपी खून केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

दोन तासांत आरोपी ताब्यात
दारूच्या नशेत असलेल्या वडिलांसोबत आरोपी मुलाचा वाद झाला. वडील नेहमीच दारू पिल्यानंतर अभ्रद्र बोलायचे. याचा राग मनात धरून लहान मुलाने कुऱ्हाडीने जन्मदात्या बापाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला दोन तासांत अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.