भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांकडं ठेवायला दिलेले 1500 रुपये त्यांनी खर्च केल्याचा राग आल्यामुळे पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे. हे पैसे जपून ठेवायला त्याने वडिलांना सांगितले होते. मात्र वडिलांकडून काही कारणाने पैसे खर्च झाल्याचं समजताच त्याला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या वडिलांची हत्या केली.
मध्यप्रदेशातील सेवढा गावात कमलेश शर्मा हे त्यांचा मुलगा सुंदरलालसह भाड्याच्या घरात राहत होते. सुंदरलाल हा एका दुकानात काम करून घर चालवत असे. तर वडिल दिवसभर घरीच असत. एक दिवस सुंदरलालने वडिलांकडे 1500 रुपये दिले आणि ते सांभाळून ठेवण्याची सूचना केली. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर त्याने त्या 1500 रुपयांबाबत आपल्या वडिलांकडे विचारणा केली असता वडिलांनी आपल्याकडून ते पैसे खर्च झाल्याचं सांगितलं.
वडिलांनी पैसे खर्च केल्याचं ऐकून सुंदरलालला राग अनावर झाला आणि त्याने वडिलांना शिविगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने जवळच पडलेल्या सळईने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.त्यातील काही वार त्यांच्या डोक्यात लागले आणि ते रक्तबंबाळ होऊन खाली पडले. वडिलांना चक्कर आल्याचं आणि त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचं पाहून सुंदरलाललनं तिथून पळ काढला. शेजाऱ्यांनी कमलेश शर्मा यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपी सुंदरलालला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.