सोनाराच्या मुलाला 20 लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरेगाव शहरातील एका सोनाराला मुलाला जीवे मारणार असल्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र भगवान मोहिते (रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी वेशांतर करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयितास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील राजेंद्र मोहिते याने पैशाच्या अडचणींमुळे सोनाराकडून खंडणी उकळण्याचा कट साथीदारांसह रचला. त्याकरिता त्याने नव्याने कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तीच्या नावे मोबाईल हँडसेट व सीमकार्ड खरेदी केले. या कार्डवरुन त्याने सोनाराला कॉल करुन तुझ्या मुलाला जीवंत ठेवत नाही, जीवंत रहायचे असेल तर 20 लाख रुपयांची खंडणी दे, असे म्हणून तो एका गुंडाचे नाव पुढे करत होता व त्याआधारे सातत्याने खंडणी मागत होता.

पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे व उपनिरीक्षक विशाल कदम यांनी तातडीने तपास कामास सुरुवात केली. मोबाईल क्रमांकावरून संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. परंतु मोबाईल क्रमांक सातारा जिल्ह्यातच वापरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पुसेगाव, भुईंजसह कोरेगाव परिसरात मोबाईल शॉपींमध्ये शोध मोहीम हाती घेतली. एकीकडे पोलीस संशयिताच्या जवळपास पोहोचत असतानाच, खंडणीखोराने सोनाराला खंडणीचे पैसे घेऊन त्रिपुटी खिंड परिसरात बोलावले. पोलिसांनी तातडीने वेषांतर केले आणि खावली, त्रिपुटी व भिवडी परिसरात सापळा रचला.

पोलिसांनी अचूक टायमिंग देखील साधले होते, मात्र पोलिसांचा संशय आल्याने खंडणीखोराने पुन्हा कॉल करुन धमकी दिली. त्यानंतर त्याने मोबाईल क्रमांक बंद ठेवला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यानंतर एका बातमीदाराने संशयित कोरेगावातील लक्ष्मीनगर परिसरात स्वत:ची ओळख लपवून राहत असल्याची माहिती दिली. या माहितीची पडताळणी करत असतानाच तो निसटण्याचा प्रयत्नात होता. मात्र, सहाय्यक निरीक्षक अर्चना शिंदे व पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु तांत्रिक माहिती सांगताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. स्वत:ला आणि साथीदाराला पैशाची अडचण होती, त्यामुळे सोनाराला खंडणी मागितली असल्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. सहाय्यक निरीक्षक अर्चना शिंदे तपास करत आहेत.

Leave a Comment