दिल्ली | महाविकास आघाडीत काॅंग्रेस पक्षाकडे ऊर्जा खाते असून सध्याच्या वीजटंचाईचा मुद्दा महाराष्ट्रात जोरदार चर्चेत आहेत. तेव्हा वीजटंचाईचे खापर आपल्या पक्षावर फोडले जावू लागले आहे. त्यामुळे काॅंग्रेसने अधिक प्रभावी काम करणे गरजेचे असून महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसची कोंडी होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीतील 10, जनपथ या निवासस्थानी गुरूवारी भेट घेतली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीत काँग्रेससमोरील आव्हाने आणि महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसची होणारी कोंडी यावर सविस्तर चर्चा केल्याचे समजते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा खाते हे काँग्रेसकडे आहे. अशातच कोळसा पुरवठावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे लोडशेडींग होणार असल्याने राज्यातील परिस्थिती कशी हाताळावी हा प्रश्न सरकारपुढे उभा आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसची भूमिका प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्या बाबतची चर्चा सोनिया गांधी यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याचे समजते.