सातारा | गतवर्षी सोयाबीनच्या दरात झालेली समाधानकारक वाढ, खरिपात बियाण्यांसह होणारी मागणी यामुळे जिह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे कल वाढला आहे. जिह्यात आतापर्यंत 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली असून, सातारा तालुक्यात सर्वाधिक लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
सातारा जिह्यात सोयाबीनची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीनचे सरासरी 65 हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, सुमारे 75 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. मागील खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत सोयाबीनची कमी-अधिक स्वरूपात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सातारा, कोरेगाव, कराड, खटाव, वाई तालुक्यांत सोयाबीनची लागवड झाली आहे.
गतवर्षी सोयाबीनचे दर 10 हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. सध्याही दर 6 ते 6 हजार 500 रुपये क्विंटल मिळत आहे. पेरणीच्या तोंडावर दरात वाढ होईल, या आशेवर सोयाबीन लागवड करण्याकडे कल वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीनची नगदी पिकाप्रमाणे काळजी घेतली जात आहे. ठिबक सिंचनाचा वापर केला जात आहे.