‘उलगुलान क्रांती’ म्हणत बिरसा मुंडांनी असा उभारला इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । भारत देश इंग्रज साम्राज्याच्या घोर सागरात बुडाला होता. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार आणि सक्तीची कर वसुली याचा क्रोध लोकमानसात खदखदत होता. १८७५ साली जन्मलेल्या बिरसाला (Birsa Munda) शिक्षण घेण्यासाठी ख्रिश्चन बनावे लागले होते. बिरसांच्या आई वडिलांना सक्तीने ख्रिश्चन बनवल्याचे त्यांनी लहानपणी डोळ्याने पाहिले होते. ख्रिश्चन बनण्यासाठी वडिलांवर झालेले अत्याचार बाल बिरसांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. शिक्षणासाठी आपल्याला आपला धर्म सोडावा लागला या गोष्टीची प्रचंड सल बिरसांच्या मनात होती. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिरसांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. बिरसांनी हिंदू धर्मग्रंथाचा अभ्यास केला. या धर्म अभ्यासातून त्यांच्या व्यक्तित्वात एवढं चैतन्य प्रकट झाले की त्यांचे दर्शन होताच लोकांना देवाचे दर्शन घेतल्याची अनुभूती येऊ लागली. लोक आजारी असल्यास बिरसांना बघताच त्यांना आजारपण गेल्यासारखे वाटत असे.

इंग्रजांचा जुलूम वाढत होता. मनमुराद शेतसारा वसूल करून गरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचा मनसुबा इंग्रजी शासन अंमलात आणत होते. या अशा मनमानी शासनास आपण कसलाच शेतसारा द्यायचा नाही. ही धरती आपली आई आहे जी धनधान्य देऊन आपले पोट भरते. धरती आपली माता असताना तिच्या मातृप्रेमाचा कसला कर सरकारला द्यायचा? हा सरळ प्रश्न बिरसांनी (Birsa Munda) लोकांच्या समोर ठेवला. मातृभूमीच्या प्रेमाचे हे विचार ऐकून आदिवासी समाज बिरसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आदिवासी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला ही इंग्रजांशी सशस्त्र संघर्ष करू लागल्या. १८९५ ते १९०० या ५ वर्षात इंग्रज विरुद्ध आदिवासी यांच्यात छोट्या नागपूर पठारावर पेटलेला संघर्षाचा वणवा भारताच्या इतिहासात ‘उलगुलान क्रांती’ या नावाने ठळक अक्षरात मुद्रित झाला. सक्तीचे धर्मांतर करणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्या आदिवासी इलाख्यात जाण्यास थरकापू लागल्या. बिरसांच्या या मातृभूमी भक्तीमुळे लोक त्यांना धरतीपुत्र म्हणून संबोधू लागले. बिरसा त्यांच्यातील कुशल नेतृत्व गुणांच्या बळावर बलाढ्य संघटन बांधू शकले म्हणूनच त्यांना लोकांनी ‘जननायक’ ही पदवी बहाल केली.

इंग्रजांच्या काळजाची धडकी उडवणारा, फिरंग्यांच्या कंठाचा कंठमनी धनुष्याच्या बाणाने फोडणारा आदिवासींचा हा विराट तांडव निरंतर सुरू असतानाच मूठभर आदिवासी इंग्रजांच्या आमिषाला बळी पडले आणि बिरसा मुंडा (Birsa Munda) झोपले असताना त्यांची गिरफतारी घडवून आणली. तुरुंगात असतानाच बिरसा मुंडा यांना मृत्यूने गाठले. कारण इंग्रजांनी त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना बेहाल केले होते. ९ जून १९०० रोजी रांची तुरुंगात बिरसा अनंतात विलीन झाले. त्यावेळी ते केवळ २५ वर्षाचे होते.

आज कुणी ही मेले अथवा मारले गेले की हे वाक्य ठरलेलं असत. “माणूस मरतो पण त्याचा विचार मरत नसतो.” हे वाक्य सर्व प्रथम बिरसा मुंडा (Birsa Munda) यांनी इंग्रजांच्या कैदेत असताना उच्चारले होते. आजही आपण झारखंडला गेल्यास तिथल्या लोकांच्या समोर बिरसांचे नाव जरी उच्चारले तरी तिथल्या लोकांच्या डोळ्यात वेगळीच चमक दठून येते. बिरसा मुंडा यांना तेथील लोकांनी देवाचा दर्जा दिला आहे. बिरसा मुंडा यांच्या नावा अगोदर ‘भगवान’ हा शब्द लावला जातो.

सुरज शेंडगे, बार्शी

९६०४७०७७४८

इतर महत्वाचे लेख –

शहीद बाबुराव शेडमाके

नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero

Leave a Comment