इस्लामपूरचे ईश्र्वरपूर नामकरण ठरावासाठी आयोजित केलेली विशेष सभा रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूर शहरासह सांगली जिल्हयात चर्चेत असणाऱ्या इस्लामपूरचे ईश्र्वरपूर नामकरण ठरावासाठी आयोजित केलेली विशेष सभा गणपुर्ती अभावी रद्द करण्यात आली. इस्लामपूर नगरपालिकेत होणाऱ्या विशेष सभेकडे संपुर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष सभेला राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीचे सर्व नगरसेवक गैरहजर राहिले तर विकास आघाडीच्या 4 सदस्यांनी पाठ फिरवली. विशेष सभेत दुपारी बारा वाजेपर्यंत 32 पैकी फक्त 10 नगरसेवक उपस्थित राहिले. त्यामुळे गणपूर्ती अभावी सभा रद्द करावी लागली.

दरम्यान, विशेष सभे ऐवजी मासिक सर्वसाधारण सभेमध्ये आता हा विषय 27 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सदस्यांनी गैरहजेरी दाखवून 35 हजार इस्लामपूरकरांचा अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत विशेष सभा सुरू झाली. नगरपालिकेच्या आवारामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांनी इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्र्वरपूर करावे यासाठी पुढाकार घेतला होता. ईश्र्वरपूरचे नामांतर होणार का? याबाबत सांगली जिल्ह्यात उत्सुकता होती.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार शिवसैनिकांना सोबत घेवून शक्ती प्रदर्शनाने नगरपालिकेत दाखल झाले. भगवे फेटे परिधान करत चारशेहून अधिक तरुणांनी इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्र्वरपूर करावे यासाठी नगरपालिकेच्या आवारात विशेष सभेच्या निमित्ताने प्रवेश केला. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी शिवसैनिकांना अटकाव केला. तरीही शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसह शिवसैनिक नगरपालिका आवारात दाखल झाले. सह्या असणारी पुस्तके भगव्या कापडात गुंडाळून नगरसेवक आनंदराव पवार यांनी हातातून वाजत गाजत आणले होते.

Leave a Comment