कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड पालिकेच्या जनरल फंडात खडखडाट आहे. त्यातून कोणतेही विकासकामे करण्यात येऊ नये, अशी सूचना जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी पालिकेच्या सभेत मांडली. त्यामुळे कराड पालिकेच्या जनरल फंडाची आर्थिक स्थिती किती डबघाईला गेलेली आहे, यांचा लेखाजोखाच जनतेच्या समोर आलेला आहे.
कराड पालिकेच्या सभेत तीन विषयांच्या मंजुरीनंतर अन्य 33 विषयांसाठी स्वतंत्र सभा घेण्याचा निर्णय घेऊन विशेष सभा तहकूब झाली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेच्या जनरल फंडातील आर्थिक टंचाईवर सभा सुरू होण्यापूर्वीच चर्चा झाली. राजेंद्र यादव म्हणाले, “पालिका जनरल फंडात आर्थिक टंचाई आहे. त्यातून कामे करताना अडचण आहे. ठेकेदार त्या फंडातून कामे करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यातून विकासकामे करू नये. जनरल फंडाची आर्थिक स्थिती काय आहे, याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणीही केली.
यावेळी विभागाचे मुख्य कमलेश रविढोणे म्हणाले, “पालिकेच्या जनरल फंडाची वाईट अवस्था आहे. त्यात केवळ तीन लाख 29 हजार रुपये बाकी आहेत. नऊ कोटींचा तोटा आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान, उत्सव भत्ता व वेतन आयोगातील फरकाचा निधी देण्यासाठी या महिनाअखेरीस तीन कोटींची गरज आहे. तेही पालिकेकडे नाहीत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे 50 लाख व ठेकेदारांचे पाच कोटी बाकी आहेत.” या स्पष्टीकरणानंतर विषयावर पडदा पडला. तीन विषयांच्या मंजुरीनंतर अन्य विषयांसाठी सभा तहकूब झाली.