काँग्रेसचा विचार घरा घरात पोहचवा : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काँग्रेसने देशाला एक विचार दिला विकासाची दृष्टी दिली. स्वातंत्र्य प्राप्ती साठी देशात एक लोकचळवळ काँग्रेस ने उभारली. स्वातंत्र्या नंतर देशातील प्रत्येक घटकाचा व विभागाचा विकास काँग्रेस सरकारने दूरदृष्टीने केला. देशभक्ती हा काँग्रेस चा आत्मा असून तो विचार प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये भिनला असून प्रत्येक कार्यकर्त्याने काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवावा असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड दक्षिण काँग्रेस कमिटी पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात बोलत ते होते. या कार्यक्रमाला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला एक परंपरा आहे. पक्ष संघटना वाढावी ती रुजावी यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झटले पाहिजे. काँग्रेसवर अनेक संकटे आली, पक्ष संपविण्याचा सुद्धा विरोधकांनी प्रयत्न केला पण काँग्रेस कधी संपली नाही कारण सर्वसामान्य कार्यकर्ता व जनता काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे विचार स्वतः मध्ये रुजवून पक्ष संघटना आपापल्या भागात बळकट करावी.