कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील मसूर- शिरवडे व रहिमतपूर- तारगांव या दोन ठिकाणच्या रेंगाळलेल्या ओव्हर ब्रिज कामांना गती मिळाली आहे. सदर पुलाची कामे अंतिम टप्प्यात सुरू असल्याने येत्या दोन महिन्यात हे पूल वाहतूकीसाठी खुले होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातून जाणा-या रेल्वे मार्गाच्या प्रश्नासंदर्भात खा. श्रीनिवास पाटील हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.
रेल्वे मार्गावरील मसूर-शिरवडे व रहिमतपूर-तारगांव या दोन ठिकाणी ओव्हर ब्रिज होत आहेत. याठिकाणी ओव्हर ब्रीज मंजूर होऊन प्रत्यक्षात त्याच्या कामाला सुरूवात झाली होती. मात्र अनेक वर्षांपासून हे काम अगदीच संथ गतीने सुरू असल्याने याठिकाणी वाहतूकीची कोंडी होऊन रहदारीत विस्कळीतपणा येत आहे. याविषयी खा. श्रीनिवास पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनांमध्ये मुद्दा उपस्थित करून त्या कामांना गती देण्याची मागणी सातत्याने केली होती. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यानी कार्यवाहीचे लेखी उत्तरही दिले होते. तर सदरचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी महारेलचे संचालक राजेश कुमार जैसवाल यांना याबाबत पत्र दिले होते.
या पत्रानुसार सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून या दोन्ही रेल्वे गेट मधून ऊसाचे ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाड्या आणि खाजगी प्रवासी वाहने व मोटार सायकल वहातूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही ओव्हर ब्रिजचे काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे सामान्य नागरिक आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर काम लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना आदेश द्यावेत अशी सूचना केली होती. त्यास राजेश कुमार जैसवाल यांनी उत्तर दिले असून त्यात म्हटले आहे, सदर पूलाचे बांधकामे प्रगतीपथावर असून मार्च महिन्या अखेरीस वाहतूकीसाठी खुले होतील. दरम्यान खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याुळे रेंगाळलेल्या पूलांच्या कामास गती मिळाल्याने सदरचे पूल दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता वाढल्या आहेत.