ढेबेवाडी | नरेंन्द्र पाटणकर
मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाने एसटीबसमध्येच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. नाना ताईगडे (वय ५७, रा. ताईगडेवाडी-तळमावले) असे संबधित वाहकाचे नाव आहे. ते पाटण डेपोत वाहक या पदावर नोकरीस होते. काल रात्री ते पाटण ते ढेबेवाडी अशी मुक्कामी एसटी बस घेवून आले होते. पहाटे तीननंतर त्यांनी ढेबेवाडी बसस्थानकामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे सकाळी निदर्शनास आले.
ताईगडे अनेक वर्षापासून एसटीत नोकरीस आहेत. त्यांनी ढेबेवाडी येथील डेपोतही अनेक वर्षे वाहतूक नियंत्रक म्हणून काम केले आहे. त्यांचा स्वभाव मन मिळावू होता. नोकरीनिमित्ताने त्यांचा भागात लोकसंग्रह मोठा होता. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यातील मजकूर समजू शकला नाही.